खर्चिक परंपरेला फाटा देत त्यांनी बांधली लग्नगाठ
वाशीम : ( दि. 6 एप्रिल )
आपला विवाह नियोजित तारखेला करून परंपरेप्रमाणे थाटामाटात साजरा करता आला असता. मात्र, देशावर ओढावलेले कोरोना चे संकट पाहता विवाहावर कुठलाच अनावश्यक खर्च न करता व वेळेचा सदुपयोग करून दि. 6 एप्रिल रोजी मनीषा अवचार व अक्षय शिंदे यांनी लग्नगाठ बांधली. रिसोड तालुक्यातील येवती येथे हा विवाह पार पडला.
सध्या देशावर कोरोना या महामारीने विळखा घातला आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त लोकांना याची लागण होत आहे. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. अश्या प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही या बाबींचा विचार करून सत्यशोधक समाजाचे जिल्हा कोषाध्यक्ष गणेश नाना शिंदे यांनी आपल्या पुतण्याचा विवाह अत्यंत सध्या पद्धतीने करण्याबाबत घरात विचारविनिमय केला. याला घरातील सर्वांनी दुजोरा दिला. तसेच नवऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी सुद्धा तयारी दर्शविली.
रिसोड तालुक्यातील येवती येथील चि. अक्षय विजय शिंदे हे बीई इंजिनिअरिंग असून पुण्यात एका सोलर कंपनीत नोकरीवर आहेत. तर मालेगाव तालुक्यातील कोठा येथील चि. सौ. कां. मनीषा रामदास अवचार ह्या एम कॉम आहेत. या उच्चविद्याविभूषित दाम्पत्यांचा नियोजित विवाह 29 मे 2020 रोजी होणार होता. मात्र, देशावर आलेल्या कोरोना च्या संकटामुळे त्यांनी खर्चिक विवाह न करता अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले. आणि ठराविक दिवस व मुहूर्ताची वाट न पाहता सोमवारीच विवाह उरकून घेतला.
आज सकाळीच वधु आणि त्यांचे आई वडील वराच्या येवती या गावी दाखल झाले. यावेळी कुठल्याही पारंपरिक बाबींवर वेळ न घालवता, कुठलाही मान पान, कपडे लते, बँड बाजा न करता एकमेकांना हार घालून अवघ्या दहा मिनिटात हा विवाह पार पडला. वधु वरांचे आई वडील आणि काका काकू एवढ्याच वऱ्हाडीच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. कुठलेही नवीन कपडे लते खरेदी न करता वधु वरांना कुंकाच्या कार्यक्रमात जे कपडे घेण्यात आले होते. त्यावरच हा विवाह लावण्यात आला.
सध्या लॉक डाऊन सुरू असल्यामुळे कलम 144 लागू आहे. या शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून हा विवाह पडला. त्यामुळे अगदी शेजाऱ्यांना सुद्धा विवाहाची कल्पना आली नसावी.
या आदर्श विवाहाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. तर अनेकांनी घरूनच मोबाईल वरून वधू वरांना आशीर्वाद दिले आहेत.