लेख - कोरोना आणि शेतकरी
वाशिम येथील रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर कोरोना मुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर साडेतोड लिखाण केले आहे. आणि लेखनीच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव दिला आहे.
त्यांच्या या कलेला दाद देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सदर लेख प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रथम लेख-
विषय :
कोरोना आणि शेतकरी
अस्मानी संकटाने पीडित असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून पीक विमा काढण्यास सांगण्यात आले. मात्र , पीक विमा कंपन्यांनी देखील शेतकर्याचा घातच केला. कोरोनामुळे या संकटात भर पडली.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. समाजातील प्रत्येक घटक याच्या संसर्गाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभावित झाला आहे. यातील एक घटक म्हणजे शेतकरी. राज्यातील एकंदरीत शेती आणि शेतकरी याची स्थिती पाहिली तर आधीपासूनच चालू असलेल्या शेतकरी आत्महत्या, निसर्गातील बदल, अवेळी पडणारा पाऊस, भीषण दुष्काळ आणि ही संकटे झेलून पिकवलेल्या पिकाला न मिळणारा हमीभाव यामुळे पुर्ण देशातील शेतकरी हा मेटाकुटिला आला आहे. उन्हाळ्यातील सर्वात अधिक खपाचे पिक आहे म्हणून शेतकरी कलिंगड, खरबूज, काकडी, गहू, उन्हाळी ज्वारी अशा अनेक प्रकारच्या पिकांची पेरणी करतो. पण जुनी संकटे काय कमी होती त्यातच आता कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळ चालणारी ताळेबंदी अस्मानी संकट म्हणून शेतकर्याच्या दारात आले आहे. माझ्या वाचण्यात आल्यानुसार राज्यातील साखर उद्योग आधीच अडचणीत सापडलेला असताना कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे साखरेची निर्यात जवळपास 20 मार्च पासुन बंद आहे. आजच्या स्थितीत साखरेचा मोठा साठा गोदामामध्ये पडून आहे त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर निर्यात बंदीमुळे आणखी भर पडली आहे. शेतीतील इतर पीक आणि भाजीपाला सडत आहे, काही शेतकर्यांनी आपले पीक स्वतःहून जाळून टाकले, फेकून दिले या घटना आपण उघड्या डोळ्याने बघत आहोत.
जागतिक स्तरावर कोरोनामुळे जे संकट आले त्यामुळे जग मोठ्या महामंदीच्या वाटेवर जाणार असे तज्ञ अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. आपले जग हे एक शतक मागे जाऊ शकते असा भयाणक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. भारत देखील या स्थितीला अपवाद नाही त्यामूळे या संकटाचा पहिला फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. प्रत्येकवर्षी शेतकरी हा महामंदीच्या वाटेवर असतो. आपल्याला आठवत असेल तर मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे दूबार पेरणीच संकट उभे राहिले होते. हे वर्ष त्यातून सावरायचे वर्ष होते कारण या वर्षी चांगला पाऊस पण झाला होता आणि शेतीमध्ये उत्पन्न ही चांगल्या प्रकारे झाले होते, पण या अचानक आलेल्या संकटाने होत्याचे नव्हते केले. चांगले झालेले पीक, फळे, भाजीपला सारख्या वस्तू ह्या नाशवंत माल आहे आणि ताळेबंदी मध्ये ते साठवून ठेवण्याची यंत्रणा शेतकर्यांकडे नाही त्यामुळे शेतकरीवर्गाला आपला किमती माल मिळेल त्या भावात देऊन टाकावा लागत आहे. यात भर म्हणून की काय दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी कर्जाचा हप्ता थकित राहणार आणि त्यावरील चढते व्याज वाढत राहणार ही शेतकरी वर्गासाठीची मोठी महामंदीच नाही का ? ताळेबंदीमुळे सर्व आठवडी बाजार पूर्वपदावर नाहीत, आठवडी बाजारात होणारी प्रचंड गर्दी पाहुन मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी असलेली मोठी बाजारपेठ पुर्ण पणे बंद करण्यात आली आहे, या क्षणी सरकारची भूमिका ही बरोबर आहे पण यात शेतकरी आणि कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. हे वास्तव दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाही.
केपीएमजीने नुकताच प्रसिध्द केलेल्या ‘कोरोनाचे संभाव्य परिणाम’ या अहवालातून जग महामंदिच्या उंबरठ्यावर उभे आहे हा इशारा देण्यात आलेला आहे. कोरोनामुळे पूरवठा आणि मागणीला सर्वाधिक फटका बसला आहे. आधी 2019 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. आता कोरोनामुळे जगभर असलेल्या ताळेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींना मर्यादा आल्या आहेत. या स्थितीत लवकर मात केली नाही तर आधीच संकटात असलेले कृषि क्षेत्र आणि शेतकरी यांची स्थिति बिकट होईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शेती, शेतकरी आणि अन्न धान्य उत्पादनाची स्थिती पाहता येणार्या काळात जागतिक स्तरावर अन्न धान्य टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि सुरक्षा प्रमुखांनी म्हटले आहे. जर असे झाले तर हे संकट फक्त शेतकर्यांपुरते मर्यादित नसणार हे आपण जाणतो. सध्याच्या घडीला शासनाने ताळेबंदीच्या दरम्यान शेतीच्या कामास सुरू ठेवण्यास सांगितले असले तरी मालाला भाव व मागणी नसेल तर शेतकरी वर्गाने जगायचे कसे ? हा प्रश्न निर्माण होतो.
अस्मानी संकटाने पीडित असलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून पीक विमा काढण्यास सांगण्यात आले मात्र पीक विमा कंपन्यांनी देखील शेतकर्यांचा घातच केला. दुसरीकडे केंद्र सरकारने या काळात शेतकरीवर्गासाठी केलेली मदतीची घोषणा अपुरी आहे, प्रत्येक खात्यात 2 हजार रुपये ही रक्कम पुरेशी आहे का ? या तुटपुंज्या मदतीने शेतकर्यांच्या समस्याचे समाधान कशा प्रकारे होइल ? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज आपल्या देशाकडे लाखो कोटी टन अन्न धान्य पडून आहे, हे धान्य कुठून आले ? आपल्या शेतकर्यांच्या कष्टाचे आणि घामाचे ते पीक आहे. ज्यांनी दिवस-रात्र एक करुन धान्य पिकवीले आहे. आज तोच शेतकरी उपाशी झोपत आहे. आज सरकारने आणि संपूर्ण लोक समूहाने ठामपणे शेतकर्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. या संकटाची झळ शेतकर्यांना अधिक बसली आहे, म्हणून आपली कल्याणकारी भूमिका निभवित शासनाने शेतकर्यांना मदतीचा भक्कम हात द्यायला हवा.
- रोशनी राठोड
समाजकार्य स्नातक भाग-1
श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम