नावली येथे ग्रामपंचायत च्या पुढाकारातुन आदर्श विवाह संपन्न
वाशीम : ( दि. 16 एप्रिल )
रिसोड तालुक्यातील नावली येथे ग्रामपंचायत च्या पुढाकारातून अवघ्या पाच पाहुण्यांच्या उपस्थितीत विनाखर्चाचा आदर्श विवाह बुधवारी दि. 15 एप्रिल रोजी पार पडला.
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे. अश्या परिस्थितीत येनकेन प्रकारे गर्दी जमविन्यावर शासनाने बंधने लादली आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत विवाह सोहळ्यांवर बंधने आली आहेत. अश्या परिस्थितीत अनेक विवाह घरच्या घरी लावले जात आहेत.
अशातच रिसोड तालुक्यातील नावली ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन गावातील नवऱ्या मुलीचा विवाह साध्या पद्धतीने घडवून आणला. नावली येथील दिवंगत पांडुरंग बाजड यांची मुलगी चि. सौ. कां. पूजा व रिसोड तालुक्यातीलच वाडी रायताळ येथील सुभाषराव मोरे यांचे चिरंजीव मृदंगाचार्य ज्ञानेश्वर यांचा नियोजित विवाह बुधवारी होता. त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे लॉक डाऊन नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने नवरदेव आपल्या आई वडिलांसह सकाळीच नावलीत हजर झाले. यावेळी ग्रामपंचायत मध्ये वधू वरांसह उपस्थितांना मास्क लावून आणि सॅनिटायझर चा वापर करून वधु वरांनी एकमेकांना हार घातले. आणि कुठलाही बडेजाव न करता तसेच कुठलाही अनावश्यक खर्च न करता विवाह लावण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने या विवाहाची नोंद करून विवाहाचे प्रमाणपत्र वधू वरांना सुपूर्द केले. ग्रामपंचायत च्या पुढाकारातून झालेला बहुधा हा जिल्ह्यातील पहिलाच विवाह असेल. या विवाहाला सरपंच गजानन बाजड, ग्रामसचिव सदाशिव रेखे, गुलाबराव शिंदे , गजानन गिरी यांची उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देश आर्थिक मंदीतून जात असताना अश्याप्रकारे विवाहावरील अनावश्यक खर्च टाळून देशहिचे कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.