परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांनी दिला मदतीचा हात

 


परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांनी दिला मदतीचा हात


वाशीम : ( दि. 8 एप्रिल ) 
     काही महिन्यांपूर्वी परराज्यातून येऊन मजुरी  करणाऱ्या कुटुंबांना काम बंद झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली होती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था तर झाली होती मात्र, पोटाचा प्रश्न कायम होता. या मजुरांची माहिती होताच दुर्बलांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या चेतन सेवांकुर च्या अंध कलावंतांनी त्या मजुरांना दि. 8 एप्रिल रोजी कुंभारखेडा येथे जावून धान्य व आर्थिक मदत देऊन मदतीचा हात दिला. 
    वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा येथे एका पुलाच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगड राज्यातील जवळपास  25 मजूर आले होते. त्यांचे कामही सुरळीत सुरू होते. अश्यात काही दिवसांपासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डावून सुरू झाल्याने त्या मजुरांना आपले काम थांबवावे लागले.  आणि त्यातच त्या कामाचे ठेकेदार सुद्धा आपल्या राज्यात निघून गेल्याने व लॉक डाऊनमुळे परत न येऊ शकल्याने मजुरांना कुणी वालीच उरला नाही. जवळ असणारे खाण्यापिण्याचे साहित्य सुद्धा संपून गेले. अश्यात कुंभारखेडा येथील पोलीस पाटील नामदेव ठाकरे यांनी कुंभरखेड्यात त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली. मात्र, खाण्यापिण्याचा प्रश्न कायम होता. 
   सदर मजुरांची माहिती चेतन सेवांकुर चे संचालक पांडुरंग उचीतकर यांना मिळाली. यानंतर त्यांनी मजुरांची माहिती घेतली आणि मदत करण्याचे ठरविले. आणि बुधवारी सकाळी एका ऑटोद्वारे त्यांना गहू, तांदूळ , डाळ व काही आर्थिक मदत पोहोचविली. यावेळी अंध कलावंत चेतन उचीतकर च्या हस्ते मदतीचे  वितरण करण्यात आले. ऐन गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीमुळे ते मजूर कृतकृत्य झाले. या मदतीमुळे त्या मजुरांच्या काही दिवसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली असली तरी त्यांना आणखी मदतीची गरज आहे.  आमच्याप्रमाणेच इतरांनीही या मजुरांना मदत करावी असे आवाहन चेतन उचीतकर यांनी केले आहे. 
  आपल्या कलेच्या जोरावर स्वतःचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच गरजूंना मदत करण्याचे कार्य चेतन सेवांकुर च्या माध्यमातून होत असते. अंध कलावंतांचा हा आदर्श वाखानन्याजोगा आहे.