महात्मा फुले आणि करड्याचे पाटील - विकास देशमुख

 


 


 


महात्मा फुले आणि करड्याचे पाटील


विकास देशमुख यांचा महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त विशेष लेख. 


महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्याकाळात पुणे परिसरातील पुरोगामी विचारांच्या कलावंतांनी सत्यशोधकी जलसा सुरू केला होता. कुठलेही पाठबळ नाही, हाती पैसा नाही, ज्या समाजाला जागे करायचे, त्याच्या हितासाठी जनजागृती करायची त्याच समाजातून शिव्या, शाप या पुरोगामी कलावंतांना मिळत होत्या. अशा स्थितीत हे कलावंत महाराष्ट्राच्या गावोगावी हिंडून, स्वत:चा जीव धोक्यात घालून कार्यक्रम करीत होते. फिरत-फिरत हा जलसा केनवड, करडा, मांगूळ झनक, गोभणी, नेतन्सा, वडजी, मेहकर परिसरात आला. कुणबी-मराठा समाजात पिढ्यानपिढ्या खोलवर रुजलेली सनातनी मानसिकता पाहता त्यांना विरोध होणे स्वाभाविक होतेच. पण, त्यावेळी करड्याचे पाटील, मांगूळचे आनंदराव झनक, केनवडचे गोळे यांनी ठामपणे या सत्यशोधकी जलशाची पाठराखण केली. एवढेच नाही तर त्यांना पुढील प्रवासासाठी आर्थिक मदत केली, महिना दीड महिना पुरेल एवढे भरगच्च धान्य दिले. स्वत:च्या समाजाचा रोष पत्करून या तीन गावच्या पाटलांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून सत्यशोधकी विचाराला बळ दिले. याच्या नोंदी थोर समाजसुधारक, सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी घेतल्या होत्या. त्यांच्या पुढच्या पिढीने हा ऐतिहासिक ठेवा आजही जपून ठेवला. आठ-दहा वर्षांपूर्वी इतिहास संशोधक सतीश जामोदकर यांची तीन पुस्तके पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील एका पुस्तकात त्यांनी करड्याच्या पाटलांनी केलेल्या मदतीचा संदर्भासह उल्लेख केला. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या गॅझेटमध्येही तो आहे. पण, सत्यशोधकी विचारांचे करड्यातील हे पाटील नेमके कोण आहेत हे अजून स्पष्ट नाही. कारण ते जे कोणी असतील त्यांनी नावासाठी नव्हे तर समाजासाठी, सत्यशोधकी विचारांसाठी ही मदत केली होती. प्रसिद्धीसाठी नाही. आजवर तमाशाच्या फडात पैसे उधळणार्‍या पाटलांचे किस्से गावोगावी सांगून पाटील हा शब्दच बदनाम केला गेला. मात्र, मानवतावादासाठी मदत म्हणून शोषित, पीडितांसाठीही अनेक पाटलांनी आपल्या तिजोर्‍या रिकाम्या केल्या. त्यांचे प्रेरणादायी किस्से कोणीच सांगत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. जामोदकर सरांनी आणि शंभर-सव्वासे वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील दीनमित्रकारांनी या मदतीच्या नोंदी ठेवल्या नसत्या तर करड्याचे महात्मा फुलेंशी असलेले हे नाते आपल्याला कधीच कळले नसते.