कोकणातली होळी फाल्गुन महिन्यातील पंचमीपासून कोकणात गावोगावी सायंकाळनंतर होळी खुंटावर ग्रामदेवतेचा गजर ऐकायला मिळतो. फाक पंचमीपासून पौर्णिमेचा व भद्रेचा शिमगोत्सव संपन्न होईपर्यंत देवीच्या जयजयकाराचा हा रंगारंग सोहळा मोठ्या उत्साहाने सुरू असतो. मानपानाला विशेष महत्त्व असलेल्या कोकणच्या शिमगोत्सवातील गावोगावच्या प्रथा मात्र निरनिराळ्या व तेवढ्याच रंजक आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधिक असलेल्या कोकणातील मंडळी ही देवभोळी समजली जातात. गुन्ह्यांप्रसंगी जेवढा कायद्याचाही धाक नाही एवढी श्रद्धायुक्त भीती गावातील ग्रामदेवतेविषयी प्रत्येक कोकणवासीयाला असते. ग्रामदेवतेचा जयजयकार करणारा वर्षभरातील महत्त्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव. या सणाला कोकणबाहेर असणारया प्रत्येक चाकरमान्याचे पाय आपापल्या गावाकडे वळतातच. अन्य वेळी वर्षभर बंद असलेली घरे शिमगोत्सवानिमित्त चाकरमान्यांच्या वर्दळीने फुलून जातात. शिमग्याचा ढोल वाजायला लागला की, प्रत्येकाच्या अंगात जणू एक अनाहुत शक्ती प्रवेश करते व पुढील काही दिवस पालखी दारापुढे येईपर्यंत प्रत्येक जण अक्षरश: ग्रामदेवतेच्या संचाराने भारलेला असतो. कोकणात तेरसे, पौर्णिमेचे आणि भद्रेचे असे विविध शिमगोत्सव साजरे होतात. यामध्ये 'भद्रा' या प्रकारातील शिमगोत्सव बहुसंख्य गावांतून संपन्न होतो. 'शिमगा' या सणाचे नाव निघताच डोळ्यांपुढे येतात ढोल, भगवी निशाणे, पिपाण्या, झांजा, पालखी, नमन आणि माड. प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. यामध्ये काही गावांतून माड उभा करताना तो सूरमाड असतो तर काही गावांतून आंब्याचा असतो. प्रत्येक गावात ग्रामदेवतेची रूपे ही चांदीची तसेच किमती आहेत. त्यामुळे शिमगोत्सवात मानकऱ्यांवर मोठी जबाबदारीही असते. ग्रामदेवतेला रूप लागल्यापासून पालख्या रांजागणी जाईपर्यंत जवळपास महिनाभर गावातील प्रमुख मानकरी आणि गावकर मंडळी अत्यंत व्यस्त असतात. असतात. शिमगोत्सवातील माड उभा करणे हा एक मोठा रंजक प्रकार असतो. हा सर्व प्रकार मोठा कठीण वाटला तरी दरवर्षी ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सारे सुरळीत पार पडते. काही गावांतून माड केवळ हाताने उभा करतात तर काही गावांतून माडाला स्पर्श न करता तो केवळ शेकडो काठ्या लावून उभा केला जातो. माड उभा करण्यापूर्वी गावातील ग्रामदेवतेचे शेकडो भक्त तो नाचवतात, खेळवतात. यावेळी कुठे खरचटले, कुठून रक्त आलं तरी या वेदनेचे भान भक्तांना नसतं. एवढे ते ग्रामदेवतेच्या जयजयकारात तल्लीन झालेले असतात. पोर्णिमेचा शिमगोत्सव तर रात्रीच्या टिपूर चांदण्यांत अन्य कोणत्याही कृत्रिम प्रकाशाशिवाय संपन्न असतो. ही प्रथा काही ठरावीक गावांमधूनच आहे. भद्रेचा होम पेटला की, या होमामध्ये नव्याने विवाहबद्ध झालेली जोडपी श्रीफळ अर्पण करतात. यानंतर सहाणेवर सुरू होते मनमुराद पालखी नृत्य. पालखी नाचविण्याची हौस या दिवशी खरया अर्थाने पूर्ण होते. शिमगोत्सवादरम्यान सर्वाधिक ताण मानकरी, गावकर आणि पोलीस यंत्रणेवर असतो. कारण हा सण मानापानाचा म्हणून ओळखला जातो. काही गावातून मानपानातील वादामुळे शिमगोत्सव वर्षानुवर्षे बंद आहे तर काही गावांतील वाद तंटामुक्तीमुळे सुटले आहेत. पालखी घरोघरी फिरू लागली की, आधी गोम् व संकासासह खेळे नाचून जातात. काही गावांतून पालखीनंतर खेळे येण्याची प्रथा आहे. गावातील सर्व घरांमधून पालखी येऊन गेली की, अखेरच्या दिवशी रात्रभर सहाणेवर पालखी नाचवली जाते. यालाच शिंपणे असे म्हणतात. दसरया दिवशी रूपे उतरवली गेली की, शिमगोत्सवाची सांगता होते आणि चर्चा सुरू होते ती ग्रामदेवतेचा कौल घेऊन करावयाच्या पारधीची.
कोकणातली होळी